Ad will apear here
Next
सुलोचनादीदी, सोनू निगम, अरनॉल्ड श्वार्झनेगर

सोज्ज्वळ सौंदर्य, शालीनता आणि सशक्त अभिनयामुळे रसिकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना, मधुर आवाज, भावपूर्ण गायकी असणारा हरहुन्नरी पार्श्वगायक सोनू निगम आणि अद्भुत शरीरयष्टी लाभलेला हॉलिवूडचा सुपरस्टार अरनॉल्ड श्वार्झनेगर यांचा ३० जुलै हा जन्मदिन. यानिमित आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी....

...... 

सुलोचना 

३० जुलै १९२८ रोजी खडकलाटमध्ये (कोल्हापूर) जन्मलेल्या रंगू लाटकर या सोज्ज्वळ सौंदर्य, शालीनता आणि सशक्त अभिनय यामुळे रसिकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना म्हणून प्रसिद्ध आहेत. चित्रमहर्षी भालजी पेंढारकर यांने त्यांचे भावपूर्ण डोळे पाहून त्यांचे नामकरण ‘सुलोचना’ असे केले. हेच नाव पुढे चित्रपटसृष्टीत रुढ झाले. अडीचशेहून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणाऱ्या सुलोचना यांना चित्रपटसृष्टीत अत्यंत आदराचे स्थान आहे. त्यांच्या आई-वडिलांचे अकाली निधन झाल्याने बनूबाई लाटकर यांनी त्यांचा सांभाळ केला. लहानपणापासून अभिनयाची आवड असलेल्या सुलोचना यांनी १९४३मध्ये मास्टर विनायक यांच्या ‘प्रफुल्ल पिक्चर्स’च्या ‘चिमुकला संसार’ या चित्रपटातून वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी रूपेरी पडद्यावर पदार्पण केले. चित्रीकरणाव्यतिरिक्त उरलेल्या फुरसतीच्या वेळात भरपूर वाचन करून, संस्कृत श्लोक पठण करून त्यांनी शुद्ध मराठी नागरी भाषा आत्मसात केली. ‘मराठा तितुका मेळवावा’ या चित्रपटात त्यांनी साकारलेली जिजाबाईंची भूमिका आजही मैलाचा दगड मानली जाते. वहिनीच्या बांगड्या, मीठ भाकर, धाकटी जाऊ हे त्यांचे चित्रपट खूप गाजले. १९४३मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीत पृथ्वीराज कपूर यांच्याबरोबर सहकलाकार म्हणून अभिनयाची सुरुवात केलेल्या सुलोचना यांनी कपूर घराण्याच्या तिन्ही पिढ्यांसोबत काम केले आहे. ‘महाराष्ट्रभूषण’, ‘व्ही. शांताराम पुरस्कार’ यांसह अनेक मानसन्मान मिळालेल्या सुलोचना यांना भारत सरकारने १९९९मध्ये ‘पद्मश्री’ किताबानेही गौरविले. त्यांच्या प्रदीर्घ अभिनय कारकीर्दीविषयी लेखक-पत्रकार इसाक मुजावर यांनी ‘चित्रमाऊली’ हे पुस्तक लिहिले आहे.

.........

सोनू निगम

३० जुलै १९७३ रोजी फरिदाबादमध्ये (हरियाणा) जन्मलेला सोनू निगम हा मधुर आवाज, भावपूर्ण गायकी, आवाजात बदल करण्याची किमया असलेला हिंदी चित्रपटसृष्टीतील हरहुन्नरी पार्श्वगायक! गाण्यात भावना व्यक्त करणे, आवाजांचा पोत बदलणे यामुळे सोनू निगमने पार्श्वगायनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांच्याकडून संगीत शिक्षण घेतलेल्या सोनू निगमने कारकीर्द घडवण्यासाठी मुंबईत खूप संघर्ष केला. मोहम्मद रफी यांची नक्कल करणारा गायक म्हणून त्याच्यावर बसलेला शिक्का पुसण्यासाठी त्याला अनेक वर्षे संघर्ष करावा लागला. मग मात्र त्याने मागे वळून पाहिले नाही. १९९०च्या दशकात झी वाहिनीच्या ‘सा रे ग म’ या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक म्हणून काम केल्यानंतर त्याची लोकप्रियता वाढली. १९९७मध्ये बॉर्डर चित्रपटातले ‘संदेसे आते है’ आणि परदेस चित्रपटातले ‘ये दिल दिवाना’ ही त्याची दोन्ही गाणी तुफान गाजली. यामुळे त्याच्या स्वतंत्र शैलीची ओळख जगाला पटली आणि मोहम्मद रफी यांची नक्कल करत असल्याचा शिक्का पुसण्यात तो यशस्वी झाला. हिंदीप्रमाणेच त्याने बंगाली, उडिया, कानडी, पंजाबी, तमिळ, तेलुगू, इंग्रजी, भोजपुरी, ऊर्दू, नेपाळी, मराठी या भाषांतही गाणी म्हटली आहेत. चित्रपटांसोबतच त्याने स्वतंत्र अल्बमही केले आहेत. मराठीत सचिन पिळगावकर यांच्या ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटातील ‘हिरवा निसर्ग हा भवतीने’ हे त्याचे गाणे लोकप्रिय झाले. अनेक चित्रपटगीतांसाठी त्याला मानसन्मान मिळाले आहेत. 

...........

अरनॉल्ड श्वार्झनेगर

३० जुलै १९४७ रोजी ऑस्ट्रियामध्ये जन्मलेला अरनॉल्ड श्वार्झनेगर हा चार वेळा ‘मिस्टर युनिव्हर्स’ स्पर्धा जिंकून, पुढे सात वेळा ‘मिस्टर ऑलिम्पिया’ विश्व-शरीरसौष्ठव स्पर्धा जिंकणारा आणि चार वेळा वेटलिफ्टिंग स्पर्धा जिंकणारा अद्भुत बॉडीबिल्डर आहे. पुढे हॉलिवूडमध्ये जाऊन अॅक्शन फिल्म्सचा हिरो म्हणून तो तुफान यशस्वी झाला. त्याची अद्भुत शरीरयष्टी पाहून त्याला हॉलिवूडमध्ये प्रचंड मारामारी आणि स्टंट्स असणारे सिनेमे मिळत गेले, ते एकापाठोपाठ एक हिट होत गेले आणि तो हुकुमी नायक बनला. हर्क्युलस इन न्यूयॉर्क, कॉनन दी बार्बेरियन, कमांडो, प्रिडेटर, रेड हीट, टोटल रिकॉल, किंडरगार्टन कॉप, टर्मिनेटर सीरिज, ट्रू लाइज, इरेझर, एंड ऑफ डेज, कोलॅटरल डॅमेज, दी एक्स्पान्डेबल्स सीरिज - असे त्याचे अनेक सिनेमे प्रसिद्ध आहेत. 

यांचाही आज जन्मदिन :

शेतकऱ्याची कुचंबणा मांडणारे लेखक सदानंद देशमुख (जन्म : ३० जुलै १९५९) 

इंग्लिश लेखिका एमिली ब्रॉन्टे (जन्म : ३० जुलै १८१८, मृत्यू : १९ डिसेंबर १८४८)

(यांच्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZJHBQ
Similar Posts
रेने गॉसिनी आपल्या अॅस्टेरिक्स कॉमिक्समुळे जगभरच्या आबालवृद्धांमध्ये प्रचंड लोकप्रिय असणारा फ्रेंच लेखक रेने गॉसिनी याचा १४ ऑगस्ट हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्याचा अल्प परिचय...
स्टॅनले क्युब्रिक, ब्लेक एडवर्डस्, हेलन मीरेन, सँड्रा बुलक अत्यंत प्रतिभाशाली आणि प्रभावशाली दिग्दर्शक स्टॅनले क्युब्रिक, ‘पिंक पँथर’ सीरिजमुळे गाजलेला दिग्दर्शक ब्लेक एडवर्डस्, अभिनयातला मानाचा समजला जाणारा तिहेरी मुकुट मिळवणारी ब्रिटिश अभिनेत्री हेलन मीरेन आणि संवेदनशील अभिनेत्री व निर्माती सँड्रा बुलक यांचा २६ जुलै हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय
विक्रम साराभाई, सेसिल डमिल भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार विक्रम साराभाई आणि अमेरिकन सिनेमाचा आद्य महापुरुष सेसिल डमिल यांचा १२ ऑगस्ट हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
शकील बदायुनी उर्दू भाषेतले मातब्बर शायर आणि गीतकार शकील बदायुनी यांचा तीन ऑगस्ट हा जन्मदिन.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language